No title

 रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक म्हणजे, गहू. आपल्या देशात गव्हाच्या सरबती, बन्सी आणि खपली या तीन प्रजातींचा लागवडीसाठी वापर केला जातो. यातही सगळ्यात जास्त म्हणजे ८८ टक्के क्षेत्र सरबती गव्हाखाली आहे तर सुमारे १० टक्के क्षेत्र बन्सी गव्हाखाली असून खपली गव्हाची लागवड जेमतेम २ टक्के क्षेत्रावर लागवड केली जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

गव्हाची पेरणी तंत्रशुध्द पध्दतीने केल्यास शेतकर्‍यांना भरघोस उत्पादन घेता येणे शक्य होते. यामुळे गहू लावडीचे तंत्रज्ञान आज आपण जाणून घेणार आहोत.

गहु या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. थंडीचे दिवस जितके जास्त मिळतील तितके पीक वाढीस पोषक ठरुन उत्पादनात वाढ होते. गव्हाच्या अधिक उत्पादनाकरीता थंडीचे किमान १०० दिवस मिळणे आवश्यक आहे. यामुळे गव्हाची पेरणी योग्य वेळी होणे गरजेचे असते. यासाठी तज्ञांनी पुढील प्रकारे काही शिफारशी केल्या आहेत.
१. कोरडवाहू गव्हाची पेरणी – ऑक्टोबरच्या दुसर्‍या पंधरवाड्यात.
२. बागायती गव्हाची – नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात पेरणीस उशीर झाल्यास १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करुनही बर्‍यापैकी उत्पादन मिळू शकते.

बागायती गव्हास पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन निवडावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य मानली जाते. कोरडवाहू गव्हाची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच करावी आणि बियाणे ओलाव्यात पडेल याची संपूर्ण काळजी घ्यावी. बागायती पेरणीचे वेळी जमिनीत पुरेशी ओल नसल्यास ओलीत करुन पेरणी करावी. कोरडवाहू व बागायती पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. तर बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर १५ किंवा १८ सें.मी. अंतर ठेवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा व्हिटावॅक्स ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २.५ ग्रॅम प्रती किलो प्रमाणे बियाण्यास चोळावी. कोरडवाहू पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. बागायती पेरणीसाठी १०० किलो प्रति हेक्टरी पूर्णासारख्या जाड दाण्यांच्या वाणांसाठी बियाण्याचे प्रमाण १२५ किलो प्रति हेक्टरी असावे), बागायती उशीरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १५० किलो बियाणे वापरावे.

रासायनिक खते:
१. कोरडवाहू परिस्थितीसाठी : प्रति हेक्टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद द्यावे. संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्यावी. बियाणे व खते एकाच वेळी पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा वापर करणे योग्य राहील.
२. बागायती वेळेवर पेरणी : १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी सोबत द्यावे. तर उरलेल्या नत्राची अर्धी मात्रा युरिया ह्या खताद्वारे मुकूटमुळे फुटण्याच्या अवस्थेच्या सुरुवातीस द्यावी.

किड / रोग नियंत्रण
खोडकिडा : क्लोरोपायरीफॉस (२० ईसी) १५ ते १६ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
तांबेरा/पानावरील करपा : मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.